निवड ‘संस्थेवर’ आणि डोळे “निवडणुकीवर”?
सावळजमध्ये राजकीय मोर्चेबांधणीला वेग; कुरघोड्यांच्या राजकारणाची चर्चा

तासगाव: मिलिंद पोळ
ओबीसी राजकीय आरक्षणाचा तिढा सुटल्यामुळे बऱ्याच काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच अनुषंगाने सावळज (ता. तासगाव) येथे स्थानिक राजकारण तापू लागले आहे. क्रेडिट सोसायटी, पतसंस्था व विकास सोसायटीच्या माध्यमातून नवीन कार्यकर्त्यांची चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व सल्लागार पदी निवडी केल्या जात आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणूक केला अजून कालावधी शिल्लक असताना स्थानिक नेते मंडळी कडून राजकीय मोर्चे बांधणीला वेग आला आहे. गेल्या काही दिवसापासून होणाऱ्या निवडी जरी संस्थेवर असल्या तरी नेत्यांचे डोळे मात्र आगामी निवडणुकीवर आहेत अशीच चर्चा नागरिकांच्यात होत आहे.
राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असणाऱ्या सावळज मध्ये ऐन पावसाळ्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सावळज गावातील स्थानिक राजकारण हे कमी अधिक प्रमाणात सहकारी संस्थांच्या भोवतालीच फिरत असते. गेल्या अनेक वर्षापासून सहकारी संस्थांच्या माध्यमातून केलेल्या कामातूनच येथील राजकीय हालचाली सुरू असतात. स्व. आर. आर. (आबा) पाटील यांच्या राजकीय वाटचालीचा शुभारंभ याच सावळज गावातून जिल्हा परिषद च्या माध्यमातून झाला होता. पुढे आर.आर.पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री व दीर्घकाल गृहमंत्री म्हणून राहिले होते.

द्राक्ष शेती व मोठी बाजारपेठ असलेल्या सावळज गावातील विविध संस्थांवर गेल्या काही दिवसात राजकीय नेत्यांनी आगामी निवडणुकांची नियोजन डोळ्यासमोर ठेवून विविध घटकातील नव्या तरुणांना आपल्या संस्थेवर नियुक्त केले आहे. या नियुक्ती मागे आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणूकाचे नियोजन असल्याचे सर्वश्रुत आहे. निवडणुकीपूर्वी नव्या कार्यकर्त्यांना पदे देऊन आपली राजकीय मांड पक्की करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावळज मधील होणाऱ्या विविध निवडी बाबत सावळज व भागांमध्ये खुमासदार चर्चा होताना दिसत आहे. विविध संस्थांमध्ये होणाऱ्या निवडी राजकीय साखर पेरणी असल्या तरी काही जणांना दिलेल्या संधी हे या राजकीय कुरघोड्या आहेत. हे स्पष्टपणे दिसत आहे. या सर्व निवडींचा आगामी निवडणुकीवर किती परिणाम होणार हे येणाऱ्या काळात दिसणार आहे.
दरम्यान, रोज नव्या कार्यकर्त्याची विविध संस्थांवर होणाऱ्या निवडीनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनचा अक्षरशः पाऊस पडत आहे. तर निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आत्तापासूनच दिसेल त्याला वाकून नमस्कार करत आहेत. या सर्व घडामोडींकडे सामान्य नागरिक मात्र मनोरंजन म्हणून बघत आहेत. कारण गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकीचा आढावा घेतला तर मतदारांचा अंदाज लावणे अवघड होऊन बसले आहे.
प्रत्यक्ष निवडणुकांना अजून काही अवधी असल्यामुळे येणाऱ्या काळात अजून काही राजकीय निवडी व कुरघोड्या पाहायला मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सावळजच्या राजकीय पटलावर सुरू असणाऱ्या या सगळ्या घडामोडींचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक व ग्रामपंचायती निवडणुकीत होतोय का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.



