# सावळज येथे इलेक्ट्रिकल दुकानात धाडसी चोरी – रोखठोक न्युज
आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

सावळज येथे इलेक्ट्रिकल दुकानात धाडसी चोरी

सीसीटीव्ही वीजपुरवठा बंद करून चोरट्यांचा शिताफीने डाव

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव, रोखठोक न्यूज

सावळज (ता. तासगाव) येथील मराठी शाळेजवळ असलेल्या एच.पी. लाईट हाऊस या इलेक्ट्रिकल दुकानात अज्ञात चोरट्यांनी अत्यंत शिताफीने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडल्यानंतर दुकानाचे मालक हर्षद पाटील यांच्या निदर्शनास हा चोरीचा प्रकार आला, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
चोरट्यांनी दुकानाच्या बाजूला असलेला पत्रा कटावणीसारख्या धारदार हत्याराने कापून दुकानात प्रवेश केला असल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले आहे. दुकानातील काउंटरमध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दुकानात व बाहेर लावलेली सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असतानाही चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी दुकानात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेर असलेल्या विद्युत मीटरमधून थेट वीजपुरवठा बंद केला. परिणामी दुकानातील तसेच बाहेरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे निष्क्रिय झाले आणि चोरट्यांना कोणताही अडथळा न येता दुकानात प्रवेश करता आला. या घटनेवरून चोरट्यांनी परिसराची आधीच रेकी करून अत्यंत काळजीपूर्वक व अनुभवी पद्धतीने चोरी केल्याचे स्पष्ट होते.
चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर दुकानमालक हर्षद पाटील यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे सावळज परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, सराईत चोरटे गावावर नजर ठेवून अशा घटना घडवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेषतः शाळा, दुकाने व वस्तीच्या परिसरात रात्रीच्या वेळी पुरेशी गस्त नसल्याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.


या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तसेच ग्रामसुरक्षा दलाने अधिक सतर्कता बाळगावी, रात्रीची गस्त वाढवावी आणि संशयित हालचालींवर कडक नजर ठेवावी, अशी अपेक्षा सावळजमधील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. चोरीच्या या धाडसी घटनेमुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, चोरट्यांना लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी होत आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!