शब्दांच्या ताकदीने समाजाला दिशा देणारी पत्रकारिता
तासगावात पत्रकार दिन उत्साहात, नगराध्यक्षा विजया पाटील यांचे प्रतिपादन

तासगाव, रोखठोक न्यूज
बदलत्या सामाजिक व राजकीय प्रवाहात माध्यमे केवळ बातम्या देणारी यंत्रणा न राहता समाजाला दिशा देणारा कणा ठरत आहेत. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका आज अधिक निर्णायक झाली आहे, असे प्रतिपादन तासगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा विजया पाटील यांनी केले.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तासगाव तालुका पत्रकार संघ व डिजिटल मिडियाच्या वतीने आयोजित पत्रकार दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अतुल पाटोळे होते.
पत्रकारिता समाज प्रबोधनाचे काम करत असून लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या नजरेतून सुटणाऱ्या बाबी जनतेसमोर आणण्याची जबाबदारी माध्यमांवर आहे, असे नगराध्यक्षा पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे यांनी, आजही वृत्तपत्र ही विश्वासार्हतेची कसोटी असल्याचे सांगत पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी विमा संरक्षण आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तालुका पत्रकार संघाने राबवलेली अपघाती विमा योजना त्यांनी विशेष कौतुकास्पद ठरवली.
भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी पत्रकार भवन व हौसिंग सोसायटीसाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार संघाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमात पत्रकारांना तीन वर्षांची अपघाती विमा पॉलिसी व जॅकेटचे वितरण करण्यात आले. मोठ्या संख्येने पत्रकार, मान्यवर व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णू जमदाडे ,सूत्रसंचालन संजय माळी, तर आभार प्रदीप पोतदार यांनी मानले.


