सावळजचा बालेकिल्ला आ.रोहित पाटील अबाधित ठेवणार
जि.प. गट व दोन्ही पं.स. गणांत राष्ट्रवादी (श. प.)ची निर्णायक मुसंडी

तासगाव, रोखठोक न्यूज
सावळजची माती आज पुन्हा पेटली आहे. कारण हा केवळ निवडणुकीचा प्रचार नाही, तर स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांच्या विचारांचा हुंकार आणि त्या वारशाचं रोहित पाटीलांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं रण आहे. आबा पाटीलांनी ज्या सावळजला घडवलं, ज्या सावळजने त्यांना डोक्यावर घेतलं तोच सावळज आज ठामपणे सांगतोय, आबांचा गड ढळणार नाही तो अबाधितच राहणार.

सहकार, संघर्ष आणि शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचं राजकारण आबा पाटीलांनी या परिसरात रुजवलं. विरोध कितीही मोठा असो, सत्ता कितीही दुरावलेली असो—सावळजने कधीही आपली ओळख बदलली नाही. आज त्या इतिहासाचा वारसदार म्हणून आमदार रोहित पाटील मैदानात उतरले आहेत. केवळ नावाचा वारसा नव्हे, तर कामाचा, निर्णयाचा आणि धाडसाचा वारसा त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून जपला आहे.
सावळज जिल्हा परिषद गट, सावळज व वायफळे पंचायत समिती गण—या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रचार वादळासारखा धडकतोय. गावोगावी फिरताना प्रचार फेऱ्यांत केवळ झेंडे दिसत नाहीत, तर आबा पाटलांच्या आठवणी आणि रोहित पाटीलांवरचा विश्वास दिसतो. चहाच्या टपरीपासून ग्रामसभेपर्यंत एकच चर्चा आहे हे आबांच्या विचारांचं आणि रोहित पाटीलांच्या नेतृत्वाचं मतदान आहे.
या वादळी प्रचारात जिल्हा परिषद उमेदवार ॲड. विजय धेंडे, सावळज पं.स. गणाचे उमेदवार प्रकाश पाटील आणि वायफळे पं.स. गणाचे उमेदवार पंकज उर्फ जितेंद्र झांबरे-पाटील हे तिन्ही चेहरे रोहित पाटील गटाचे रणांगणातले शिलेदार बनले आहेत. हे केवळ उमेदवार नाहीत, तर आबा पाटलांच्या विचारांचे सैनिक आहेत, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये ठाम आहे.
या प्रचाराची खरी धार म्हणजे आ.रोहित पाटील यांचा थेट, आक्रमक आणि सातत्यपूर्ण सहभाग. कुठेही औपचारिकता नाही, कुठेही दुरावा नाही. कार्यकर्त्यांशी थेट संवाद, जुन्या सहकाऱ्यांची पुन्हा मोट बांधणे आणि नव्या पिढीला आबांच्या विचारांशी जोडण्याचं काम रोहित पाटील स्वतः करत आहेत. त्यामुळे प्रचाराला केवळ वेग नाही, तर भावनिक उर्जा मिळाली आहे.

प्रचार सभांमध्ये जेव्हा स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो, तेव्हा गर्दीत शांतता पसरते… आणि पुढच्याच क्षणी घोषणांचा आवाज आकाश फाडतो आबा पाटलांचा गड, रोहित पाटीलांच्या हाती! हा आवाज केवळ घोषणांचा नसून, तो सावळजच्या जनतेचा सामूहिक निर्धार आहे.
एकीकडे विकासकामांची ठोस मांडणी, दुसरीकडे आबा पाटलांचा अमिट वारसा आणि तिसरीकडे रोहित पाटीलांचं धडाडीचं नेतृत्व या तिहेरी ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सावळज परिसरात वर्चस्व गाजवत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ जागांची लढत न राहता, इतिहास, अस्मिता आणि नेतृत्वावरचा विश्वास व्यक्त करणारा कौल ठरणार असल्याचं चित्र स्पष्ट होत चाललं आहे.



