तासगाव निवडणूक २०२५ : प्रभाकर पाटील यांच्या जोशपूर्ण नेतृत्वात विजया पाटील यांच्या जनसंवाद मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभागनिहाय भेटी, ठोस विकास दृष्टिकोन आणि संघटित प्रचारामुळे उमेदवारीकडे वाढते अपेक्षांचे लक्ष

तासगाव :रोखठोक न्यूज
तासगाव नगरपरिषद निवडणुकीत स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. विजया बाबासो पाटील यांच्या जनसंवाद मोहिमेला शहरातील सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यांची उमेदवारी या निवडणुकीत मजबूत दावेदारी म्हणून उभी राहत आहे. शहरातील १२ प्रभागांत विजया पाटील यांनी केलेल्या दौऱ्यांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, घर-घर भेटींच्या माध्यमातून त्यांनी सर्वांपर्यंत थेट पोहोच साधली आहे. साधी, मनमोकळी शैली, प्रभागनिहाय संवाद आणि तातडीने समस्या ऐकून घेण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे मतदारांमध्ये त्यांच्या जनसंपर्क मोहिमेची मजबूत छाप निर्माण झाली आहे.
स्वाभिमानी विकास आघाडीचे युवा नेते प्रभाकर पाटील, प्रभाग १० चे उमेदवार सतीश लिंबळे आणि संध्या संजय लुगडे यांनीही प्रचारात सक्रिय सहभाग घेत मोहिमेला अधिक जोश दिला आहे. प्रभाग १० मध्ये प्रभाकर पाटील यांनी घर टू घर जाऊन नागरिकांना भेटत आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. “माजी खासदार संजय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे तासगावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. पुढील काळातही स्वच्छ, सुंदर आणि अभिमान वाटेल असं तासगाव घडवण्यासाठी स्वाभिमानी आघाडीला साथ द्या,” असे ते म्हणाले.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया पाटील यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडत, “तासगावकरांच्या विश्वासाला पात्र ठरेल अशी विकासात्मक कामगिरी करून दाखविण्याची जबाबदारी मला द्यावी,” असे आवाहन केले. महिला बचतगटांमधील त्यांचा सक्रिय सहभाग, विविध सामाजिक उपक्रमांतील सातत्यपूर्ण कामगिरी आणि घराघराशी मजबूत संवाद यामुळे महिलांमध्येही त्यांच्याबद्दल उत्सुकता आणि विश्वास वाढताना दिसत आहे.
विजया पाटील यांच्या उमेदवारीचा आणखी एक भक्कम आधार म्हणजे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या कार्याचा वारसा. शहरातील मूलभूत सुविधांचा विकास, रस्ते-विस्तार, स्वच्छता सुधारणा आणि सामाजिक उपक्रमांमुळे त्यांनी निर्माण केलेला विश्वास आजही नागरिकांच्या लक्षात आहे. या पार्श्वभूमीवर विजया पाटील यांच्या उमेदवारीकडे नागरिक आशेने पाहत असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

तासगावातील सर्व १२ प्रभागांमध्ये त्यांचा वाढता प्रभाव, संघटित प्रचारयोजना, नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद आणि स्पष्ट विकासदृष्टिकोनामुळे विजया पाटील या निवडणुकीत एक सक्षम आणि प्रभावी पर्याय म्हणून समोर येत आहेत. शहरात ठिकठिकाणी त्यांना मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता “या निवडणुकीत विजया पाटील मजबूत दावेदार ठरणार” अशी चर्चा वेगाने पसरली आहे.
तासगावमधील निवडणूक रंगतदार होत असताना, स्वाभिमानी विकास आघाडीची मोहिम जोमात असून विजया बाबासो पाटील यांच्या उमेदवारीकडे संपूर्ण शहराचे लक्ष वेधले आहे.



