तासगाव तालुक्यात निवडणूक रणधुमाळी शिगेला
वाढीव प्रचारकाळामुळे राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची

तासगाव, मिलिंद पोळ
तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून संपूर्ण तालुका सध्या राजकीय रणधुमाळीने अक्षरशः ढवळून निघाला आहे. प्रशासनाकडून ५ फेब्रुवारी रोजी होणारे मतदान पुढे ढकलत ७ फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच उमेदवारांना प्रचारासाठी एक ते दोन दिवसांचा वाढीव कालावधी मिळाला आहे. या निर्णयामुळे प्रचार अधिक तीव्र झाला असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
तासगाव तालुक्याच्या राजकारणाचा इतिहास पाहता येथील निवडणुका प्रामुख्याने पारंपरिक गटांमध्येच लढवल्या गेल्याचे दिसून येते. सध्या आमदार रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील या दोन प्रमुख गटांमध्येच मुख्य लढत रंगत असल्याचे चित्र आहे. मात्र, २०२६ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटानेही स्वतंत्रपणे आपले उमेदवार रिंगणात उतरवले असल्याने या पारंपरिक लढतीला नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे आमदार व माजी खासदार या दोन्ही गटांना मतविभागणीचा फटका बसणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
तासगाव तालुक्यात एकूण ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत आहे. २०१७ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तत्कालीन एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुक्यावर ठळक वरचष्मा राहिला होता. त्या काळात तत्कालीन आमदार सुमन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता स्थापन झाली होती. तसेच सहापैकी चार जिल्हा परिषद गट राष्ट्रवादीकडे होते, तर उर्वरित दोन गटांवर त्या वेळी भाजपमध्ये असणारे माजी खासदार संजय पाटील यांनी आपले वर्चस्व राखले होते.
मात्र, २०१७ ते २०२६ या कालावधीत केवळ तासगाव तालुक्याच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. तत्कालीन एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस आज दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. त्याचबरोबर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी खासदार संजय पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेतले, हेही तालुक्याच्या राजकारणातील महत्त्वाचे वळण ठरले.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहित पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय पाटील हे दोघे आमने-सामने आले होते. या लढतीत रोहित पाटील यांनी माजी खासदारांना पराभवाचा धक्का दिला. या विजयामुळे आमदार गटाचा आत्मविश्वास दुणावला आणि त्याच जोरावर राष्ट्रवादीने तासगाव नगरपालिका निवडणुकीतही जोरदार टक्कर दिली. मात्र, काही ठिकाणी गाफीलपणा आणि स्वपक्षातील बंडखोरी याचा फटका बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तासगाव नगरपालिका निवडणुकीत अत्यंत काठावरचा पराभव स्वीकारावा लागला.
नगरपालिका निवडणुकीतील या चुका लक्षात घेत आमदार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सुधारित रणनीती आखली आहे. दुसरीकडे, माजी खासदार संजय पाटील यांनी तासगाव नगरपालिका निवडणूक विकास आघाडीच्या माध्यमातून लढवत यश मिळवले होते. या यशामुळे माजी खासदारांचा संपूर्ण गट पुन्हा एकदा रिचार्ज झाला असून याच आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, तासगाव तालुक्यातील दोन पारंपरिक गट पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीप्रमाणेच थेट एकमेकांच्या आमने-सामने उभे ठाकले आहेत.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाने उभे केलेले आव्हान तासगावच्या राजकारणात अधिक रंगत आणणारे ठरत आहे. सुरुवातीला दुरंगी वाटणारी ही निवडणूक आता चौरंगी लढतीकडे झुकताना दिसत आहे. आमदार रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील यांनी निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण तालुका पिंजून काढला असून दोन्ही नेते पायाला भिंगरी लावून प्रचारयंत्रणा राबवत आहेत. त्यांच्या उमेदवारांनीही घराघरांत जाऊन संपर्क साधण्यावर भर दिला आहे.
ग्रामीण भागात प्रचार वाहनांचा आवाज गल्लोगल्ली आणि वाड्या-वस्त्यांवर घुमू लागला आहे. शहरी भागातील आधुनिक प्रचारतंत्र आता ग्रामीण भागातही प्रभावीपणे वापरले जात असून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराला विशेष जोर दिला जात आहे. उमेदवारांकडून प्रचाराच्या रिल्स तयार करून त्या व्हायरल करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे. थेट प्रचारासोबतच सोशल मीडियावरील हा प्रचार प्रभावशाली ठरत असून AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेले प्रचार व्हिडीओ ग्रामीण भागात चर्चेचा विषय बनले आहेत. विविध पक्षांचे जाहीरनामे, विकासकामांची यादी आणि भविष्यातील आश्वासने यावर गावागावच्या पारा-पारावर रंगतदार चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, पक्षाकडून संधी न मिळाल्याने नाराज झालेले काही कार्यकर्ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असून तेही ताकदीने प्रचार करत आहेत. अपक्ष उमेदवारांची संख्या आणि त्यांची सक्रियता लक्षात घेता काही मतदारसंघांत समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
५ फेब्रुवारी रोजी प्रचाराच्या तोफा थंड होणार असून ७ फेब्रुवारीला मतदान, तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत नशीब आजमावणारा प्रत्येक उमेदवार अक्षरशः रात्रंदिवस प्रचारात व्यस्त आहे. नेतेमंडळींच्या बैठका, कोपरा सभा आणि जोरदार प्रचारामुळे तासगाव तालुक्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
येळावी–चिंचणी गटातील राजकीय नाट्य
येळावी जिल्हा परिषद गटात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात थेट लढत रंगली असून, माजी खासदार गटाने या ठिकाणी उमेदवार न देता काँग्रेसच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याची उघड चर्चा आहे. त्यामुळे या गटातील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत.
दुसरीकडे, चिंचणी जिल्हा परिषद गटात माजी खासदारांच्या सुपुत्रांनी कौटुंबिक कारण पुढे करत आपली उमेदवारी माघारी घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या गटात माजी आमदार दिवंगत दिनकर आबा पाटील यांचे नातू राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत असून, येथेही माजी खासदार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवार न दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
येळावी आणि चिंचणी या दोन्ही गटांतील घडामोडींमुळे तासगाव तालुक्यातील निवडणूक केवळ पक्षीय न राहता अप्रत्यक्ष पाठिंबे, कौटुंबिक निर्णय आणि रणनीतीच्या खेळींमुळे अधिक नाट्यमय बनली आहे.



