सावळज जि. प. गटाचा कौल : अपराजित वारसा की नव्या इतिहासाची नांदी?

✍🏻सावळज – रोखठोक न्यूज
तासगाव तालुक्याच्या राजकीय नकाशावर सावळज जिल्हा परिषद गट हे नाव केवळ एक मतदारसंघ नाही, तर सत्तेचा वारसा, परंपरा आणि अपराजित इतिहासाचं प्रतीक मानलं जातं. स्वर्गीय आर. आबा पाटील यांच्या काळापासून आजपर्यंत या गटावर आमदार गटाचं एकतर्फी वर्चस्व राहिलेलं आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदारांचं गावही याच जिल्हा परिषद गटात येत असल्यामुळे हा मतदारसंघ आमदार गटासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न ठरला आहे.याच कारणामुळे यंदाच्या निवडणुकीत सावळज जिल्हा परिषद गट संपूर्ण तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. आमदार गटाचा हा अभेद्य किल्ला भेदण्याकडे सर्वच विरोधकांचं विशेष लक्ष लागलं आहे.
इतिहास सांगतो : प्रयत्न झाले, पण यश नाही
सावळजचा इतिहास पाहिला, तर हे पहिल्यांदाच होत नाही की विरोधकांनी आमदार गटाला इथे अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीही याच मतदारसंघात वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये
यावेळी समीकरण बदलणार, किल्ला ढासळणार
अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष निकालात आमदार गटाचा अपराजित वारसा कायम राहिला, आणि विरोधकांना प्रत्येकवेळी माघार घ्यावी लागली, हा आजवरचा इतिहास आहे.
म्हणूनच यंदाची निवडणूक केवळ एक लढत न राहता,
इतिहास कायम राहणार की नवा इतिहास घडणार?
हा प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.
जिल्हा परिषद गट : उमेदवारांची गर्दी
अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सावळज जिल्हा परिषद गटात यंदा लढत बहुरंगी आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून ॲड. विजय धेंडे, भाजपकडून पोपट हंकारे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रवीण धेंडे, शिवसेनेकडून प्रशांत सदामते, तर अपक्ष म्हणून चंद्रकांत सरवदे निवडणूक रिंगणात आहेत.
आमदार गटाचा इतिहास लक्षात घेता, विरोधकांची रणनीती स्पष्ट आहे मतं विभागायची, गटात संभ्रम निर्माण करायचा आणि शेवटच्या फेरीत धक्का द्यायचा. मात्र सावळजच्या मतदारांनी आतापर्यंत नेहमीच आपला निर्णय शेवटच्या क्षणीच जाहीर केला आहे, हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे.
पंचायत समिती गण : बंडखोरीने वाढवली धाकधूक
सावळज पंचायत समिती गण सर्वसाधारणसाठी राखीव असला, तरी राजकीय तापमान मात्र शिगेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रकाश पाटील, शिवसेनेकडून प्रमोद उगारे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऋषिकेश बिरणे, भाजपकडून विश्वास निकम, तर अपक्ष म्हणून तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय उर्फ दत्तात्रय पाटील मैदानात उतरले आहेत.आमदार गटाचे कट्टर कार्यकर्ते मानले जाणारे संजय उर्फ दत्तात्रय पाटील अपक्ष म्हणून लढत असल्याने,
ही बंडखोरी आमदार गटाला अडचणीची ठरणार का ?
हा प्रश्न प्रत्येक चहाच्या टपरीवर चर्चेत आहे.
वायफळे गण : दोन उमेदवार, पण थेट सामना
वायफळे पंचायत समिती गणात चित्र अगदी स्पष्ट पण तितकंच थरारक आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जितेंद्र उर्फ पंकज झांबरे–पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुखदेव पाटील — एवढे दोनच उमेदवार.इथे प्रचार कमी, पण गणित अधिक. एकही मत इकडे-तिकडे गेलं, तर निकाल पूर्णपणे उलटू शकतो, अशी स्थिती आहे.
प्रचाराचा नवा अवतार : बैलगाडीपासून AI पर्यंत
संपूर्ण मतदारसंघात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.
सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत वाड्या-वस्त्यांवर उमेदवारांची धावपळ सुरू आहे.प्रचार गाड्या, पत्रके, वचननामा, जाहीरनामा यांसोबतच आता AI तंत्रज्ञानातून तयार झालेल्या व्हिडिओ रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कालपर्यंत शहरापुरती मर्यादित असलेली हायटेक प्रचार पद्धत आता सावळजच्या मातीत उतरली आहे.हातात मोबाईल, डोक्यात राजकारण आणि ओठावर विकासाच्या घोषणा असं चित्र सर्वत्र दिसतंय.
इतिहास की परिवर्तन?
एकंदरीत काय, तर सावळज जिल्हा परिषद गटाची ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर इतिहास आणि परिवर्तन यांच्यातील थेट लढत आहे.स्वर्गीय आर. आबा पाटील यांच्यापासून सुरू असलेला आमदार गटाचा अपराजित वारसा यंदाही टिकणार की विरोधक नवा इतिहास घडवणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे.आता निकाल काहीही असो,सावळजचा कौल तासगावच्या राजकारणाची दिशा ठरवणार, हे मात्र नक्की



