“स्क्रिप्ट जुनीच, कलाकार तेच! तासगावच्या निवडणूक रणांगणात सत्तेचा नवा सिनेमा
“एबी फॉर्म कोणाला? २१ जानेवारीनंतर तासगावमध्ये सुरू होणार नाराजी नाट्याचा ब्लॉकबस्टर”

तासगाव, मिलिंद पोळ
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा झाली आणि तासगाव तालुक्यात राजकीय पडदा वर गेला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या या निवडणूक ‘चित्रपटात’ मात्र कथानक तेच, कलाकार तेच आणि संवादही जुनेच असल्याची भावना आता मतदारांमध्ये उमटू लागली आहे.
निवडणूक प्रक्रियेतील सध्या सर्वात मोठा सस्पेन्स म्हणजे उमेदवारीचा अंतिम निर्णय. २१ जानेवारी ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून, अनेक इच्छुकांनी केवळ उमेदवारी अर्ज दाखल करून मैदानात उपस्थिती नोंदवली आहे. मात्र खरी लढाई अजून बाकी आहे. कारण पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म नेमका कुणाच्या हाती पडणार, याबाबत अद्यापही गूढ कायम आहे.
हा सस्पेन्स २१ जानेवारीच्या दुपारी संपणार असला, तरी त्यानंतर सुरू होणारा नाराजी नाट्याचा नवा अध्याय हा पक्षातील आणि तालुक्यातील नेतेमंडळींसाठी मोठी डोकेदुखी ठरणार, हे मात्र आताच स्पष्ट दिसत आहे. एबी फॉर्म मिळाल्यानंतर आनंदोत्सव होईल, तर न मिळालेल्यांकडून नाराजी, बंडखोरी, आरोप-प्रत्यारोपांचा ‘डायलॉगबाजी’चा फुल्ल ऑन शो सुरू होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मुळात कार्यकर्त्यांची असते, पण तासगाव तालुक्यात मात्र ही लढत पुन्हा एकदा प्रस्थापित विरुद्ध अपेक्षाभंग झालेला कार्यकर्ता अशी होताना दिसत आहे. प्रचारात झिजणारे कार्यकर्ते केवळ पार्श्वभूमीत राहतात आणि मुख्य भूमिकेत मात्र नेहमीचेच कलाकार झळकतात, अशी टीका आता उघडपणे केली जाऊ लागली आहे.
कोरोनाच्या काळात जनतेपासून दूर असलेले अनेक चेहरे आज पुन्हा एकदा ‘कमबॅक’च्या तयारीत आहेत. अनेकदा संधी मिळूनही ठोस विकासकाम न करणारे पुन्हा मैदानात उतरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. नेतेमंडळीच्या भाषणांमध्ये मात्र विकासाचे मोठमोठे संवाद रंगतात तरुणांना संधी, सर्वांगीण विकास, सुवर्णकाळाची आश्वासने दिली जातात. प्रत्यक्षात मात्र उमेदवारीची माळ पुन्हा प्रस्थापितांच्याच गळ्यात पडताना दिसते आहे.
तालुक्यात रस्ते, पाणी, सिंचन, उद्योग यांसारखे मूलभूत प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. विकासाचे पोस्टर्स झळकतात, पण प्रत्यक्ष विकासाचा दुष्काळ कायम आहे. अशा पार्श्वभूमीवर ही निवडणूक केवळ सत्ता किंवा पदाची नसून विश्वास आणि अपेक्षांच्या कसोटीची ठरणार आहे.
आता खरा प्रश्न एकच आहे,
यावेळी स्क्रिप्ट बदलेल का, की पुन्हा तोच जुना सिनेमा?
२१ जानेवारीनंतर पडदा पूर्ण उघडेल… आणि मग मतदार राजा या चित्रपटाचा शेवट कसा करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.



