संजयकाकांचा सलोख्याचा संदेश : नगराध्यक्ष दालनात स्व. आर.आर.आबांची प्रतिमा
तासगावात सत्तास्थापनेच्या पहिल्याच दिवशी समन्वयाचा सूर

तासगाव, रोखठोक न्यूज
तासगाव नगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पहिल्याच दिवशी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी राजकीय सलोख्याचा संदेश देत नगराध्यक्ष दालनात स्व. आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेसाठी निर्देश दिले. स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्षा सौ. विजया बाबासो पाटील व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पदभार स्वीकार समारंभात हा निर्णय घेण्यात आला.
विरोधी विचारसरणीतील नेतृत्व असतानाही ‘तासगावचे प्रतिनिधित्व राज्यात करणारे नेते’ म्हणून स्व. आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेला स्थान देण्याची सूचना करत संजयकाका पाटील यांनी विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका मांडली. नगरपालिका ही पक्षाची नव्हे, तर शहराच्या विकासाची संस्था आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे नव्या सत्तेच्या वाटचालीत समन्वय व सकारात्मकतेचा सूर दिसत असून, शहरात याचे स्वागत होत आहे. निवडणुकीनंतर मतभेद बाजूला ठेवून विकासाला प्राधान्य देण्याचा हा संकेत असल्याची प्रतिक्रिया नागरिक व राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.



